Tuesday, September 23, 2008

प्रवास

जीवनाचा अर्थ शोधत
मी जगत गेलो
प्रत्येक वेदनेचा
नवा अर्थ लावत गेलो!

तुटलेल्या नात्यांमधून

नवे संदर्भ जुळवत गेलो

गवासलेल्या आनंदातून

जुन्या जखमा भरत गेलो

अनोळखी वाटांवरून

उत्सुकतेने चालत गेलो
माणसांच्या गर्दीत चेहरा
ओळखीचा शोधत गेलो!

अनेक मनांच्या वस्तीत
कित्येक काळ राहात गेलो
त्या वस्तीतील सोहळे

रस्त्यावरून पाहात गेलो!

प्रत्येक स्पर्शाचा
नवा अर्थ लावत गेलो
नव्या स्पर्शताही
जुना गंध शोधित गेलो!

आयुष्यातील अफाट लाटांसमोर

कधी धिटपणे उभा राहिलो
अश्रुंच्या दोन थेंबांसमोर

कधी पुरता वाहून गेलो!

Monday, September 8, 2008

असा मी कसा मी ?

घडखोल पाटियाच्या शाळेतल्या सर्वांचा निरोप घेउन मी कंपनीच्या सुमो मधे येउन बसलो. संध्याकाळचा उशीर झाल्याने ड्राईवर किशोर ला सुमो थेट कॉलोनीकडे घ्यायला सांगितली. शाळेतला कार्यक्रम छानच झाला. कंपनी च्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पोंसिबिलिती) धोरणा अंतर्गत आम्ही आमच्या फॅक्टरी च्या जवळ पास आसलेल्या शाळांना काही मदत करायचे ठरवले. नुसतेच आर्थिक योगदान न देता आम्ही त्यांना शाळेमधिल इमारती, वर्गाची डागडुजी, नवीन बेंचेस, स्वच्छताग्रृहांची बांधणी अशा प्रकारे मदत करत होतो ही मीटिंग त्या संदर्भातच होती।


शाळेतल्या शिक्षकांनी आमच्या कंपनी आणि मी ह्या प्रोजेक्टमधे वैयक्तिक लक्ष घातल्याबद़दल मनापासून आभार मानले. मग मी जरा सुखावालोच गेलो. नेहेमीच्या कामाच्या धबडग्यात असं काहीतरी समाजोपयोगी करणे उभे माझ्याबद्दल असलेल्या ‘परोपकारी, कतॅव्यतत्पर’ प्रातिमेशी सुसंगत होते. “आता उरलेल्या पाच शाळांचे प्रोजेक्ट्स सुद्धा महिना अखेरी पयॅन्त हातावेगळे केले पाहिजेत”, मी स्वतःला बजावले.


अचानक आमच्या सुमोने करकचून ब्रेक दाबले आणि त्या धक्क्याने मी एकदम विचारातून भानावर आलो. किशोरने सुमोचा वेग कमी केला होता. समोर बघितले तर आमच्या सुमो शेजारी एक माणूस जखमी होवून पडला होता – आणि उठून उभा रहायची धडपड करत होता. त्याचा शर्ट रक्तानी माखला होता आणि डावा डोळा पूर्ण फुटला होता. "कुणीतरी त्याला धड़क दिलेली दिसतीये" – किशोर ड्रायव्हरनी माहिती पुरवली. तो जखमी तरुण एक हाताने मदतीसाठी येणाऱ्र्या जाणाऱ्र्या वाहानांना थांबवायचा प्रयत्न करत होता.


मी तर एकदम सुन्नच झालो. टीवी वर कितीही रक्तरंजित दृश्य पहिली तरी हे समोरचे सत्य हेलावून टाकणारे होते. मला काय करावे ते एकदम सुचेना. ह्या माणसाला मदत करावी का? जवळच माझ्या माहितीचे हॉस्पिटल आहे – तिथे त्याला उचलून नेले तर? मी माझे विचार किशोरला बोलून दाखवले. किशोर ह्या गोष्टीत अनुभवी असावा. त्याने असे केल्याने आपल्याला पुलिस चौकशीला कसे सामोरे जावे लागेल आणि आपण नको तो ससेमिरा कसा मागे लावून घेवू हे मला बजावून सांगितले. मला ते पटले.. आम्ही तशीच गाड़ी पुढे दामटली आणि कोलोनीमधे पोचलो.


रात्रभर मी बेचैन होतो. त्या जखमी तरुणाचे मदती साठीचे हात आणि त्याचा फुटका डोळा नजरेसमोर येत होता. आपण त्याला मदत केली नाही त्यामुळे खुप अपराधी वाटत होता. माझे स्वतः बद्दलचे ‘परोपकारी, कर्ताव्यतत्पर’ असे अनेक गैरसमज त्या अनुभवातून गळून पडले.


बऱ्याच वेळा आपल्याला आपण कसे असावे (should be) त्याच्या काही अपेक्षा असतात. ह्या अपेक्षा आजु बाजुला बाकीच्यांना बघून, काही वाचून आपण निर्माण केल्या असतात (उदा. सत्यवादी, प्रमाणिक असणे वगैरे). काही काळानंतर आपण स्वतः खरेच असे आहोत असा आपण समज करून बसतो. मग कधीतरी आरशात किंवा स्वताहमधे डोकावून आपले खरे स्वरुप बघून दचकायला होतं. आत्तापर्यंत मानत असलेल्या ‘मी असा’ ह्या प्रतिमेपेक्षा ‘मी तसा’ ही प्रतिमा अधिक गडद आणि वास्तव असते.


आपल्या सगळ्या समज-गैरसमाजांची कसोटी कठिण प्रसंगीच होते. खरे बोलण्याने शिक्षा होणार आहे हे कळुनही खरे बोलणे ही परिखा. त्या वेळेस जो परिक्षेस उतरला तो खरा – बाकीचे सगळे बडबड करणारे ‘मी-माझे’. असे मी माझे आपल्याला खूप सापडतात – किम्बहुना आपल्याताही एक मी – माझा दडून बसलेला असतोच – “मी खोटेपणा चालवून घेणार नाही, अन्याय सहन करणार नाही, माझे नुकसान झाले तरी चालेल पण दिलेला शब्द पाळणारच” वगैरे वगैरे..


मग तुम्ही केव्हा उभे राहताय आरशासमोर आणि न्याहाळून बघते - "मी कसा" ला?!











Saturday, September 6, 2008

राहूनच गेले !

जगायचे जगायचे असे म्हणताना
जगायचे राहूनच गेले

जीवनाशी सूर जुळवताना

मुक्तपणे गायचेच राहून गेले


खूप काही अनुभवले
खूप काही सहन केले
अश्रूंच्या संगतीत राहताना
आनंदाच्या पावसात
भिजायचेच राहून गेले

नशिबाचे फासे उलटेच पडले
तरीही हा खेळ खेळतच राहिलो
सगळयान्ना सतत देण्यात
स्वताहाचे दान मागायचे

राहूनच गेले

वाटेतच खूपजण भेटले

काहीजण थांबले तर

काहीजण खूप पुढे निघून गेले

सगळयान्शी ओळख वाढवण्यात

स्वतःला ओळखायचेच

राहून गेले

तरीही अजून

जगायचयं असा म्हणताना

त्याचे कारण शोधायचेच

राहून गेले !

पिंपळपान

माझे जगणे पिंपळपानासारखे असावे
जोपर्यंत जीवंत असेल वृक्ष
तोपर्यंत रहावे ताजे, टवटवित

अगदी शेवट जवळ आल्यावरही
अलगद तरंगत खाली यावे
कोणालाही ओझं न बनता

जीवनातला सगला हिरवेपणा गेला
तरी उरलेल्या रेघांची जाळी
इतकी सुंदर असावी की

कोणीही पटकन उचलून घ्यावे
मनाच्या कोपरयात जपून ठेवायला
किंवा एखाद्या अगदी आवडत्या
व्यक्तीला देऊन टाकायला

माझे जगणे पिंपळपानासारखे असावे !